Menu

स्तोत्रसंहिता 96

CBI

1 याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा. 2 याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा. 3 सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा. 4 कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे. 5 इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे. 6 राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि महिमा असतो. 7 अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या. 8 याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या. 9 त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! 10 राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.” सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील. 11 आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो; सागर व त्यातील सर्वकाही त्यांच्या गौरवाची गर्जना करोत. 12 शेते व त्यातील सर्वकाही अति आनंदाने नाचू लागोत; वनातील सर्व झाडे हर्षाने गुणगान करो. 13 सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate