स्तोत्रसंहिता 95
CBI1 या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या; आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या. 2 कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू. 3 कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत; समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत. 4 पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत. 5 समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले, आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे. 6 या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या, आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू; 7 कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे! 8 “मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका. 9 माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले. 10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’ 11 मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ “
