Menu

स्तोत्रसंहिता 138

CBI

1 हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन. 2 उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन, आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल, तुमची उपकारस्तुती करेन, कारण तुम्ही तुमच्या वचनाला तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे. 3 जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले. 4 हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील, कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील. 5 ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे. 6 याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात. 7 मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो. 8 याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate