स्तोत्रसंहिता 110
CBI1 याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा." 2 याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील, “तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!" 3 तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील. 4 याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस." 5 तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे; आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील. 6 ते राष्ट्रांवर आपला यथार्थ निकाल घोषित करतील, मृतदेहांचा ढीग लागेल आणि ते संपूर्ण पृथ्वीच्या शासकांना चिरडून टाकतील. 7 तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील, आणि आपले मस्तक उंचावतील.
