Menu

स्तोत्रसंहिता 109

CBI

1 हे माझ्या स्तुतिपात्र परमेश्वरा, तुम्ही मौन धारण करू नका, 2 कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे; ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत. 3 त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात. 4 माझ्या मैत्रीच्या बदल्यात ते माझ्यावर आरोप करतात, परंतु मी निरंतर प्रार्थना करणारा मनुष्य आहे. 5 ते बर्‍याची फेड वाईटाने करतात आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात. 6 त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा; आरोप लावणारा त्याच्या उजव्या हातास उभा ठेवा. 7 त्याचे प्रकरण निकालासाठी येताच तो दोषी ठरविल्या जावो, त्याचीच प्रार्थना त्यास दंडाज्ञा देवो. 8 त्याच्या आयुष्याची वर्षे अल्पकालीन होवोत; त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत. 9 त्याची मुले पितृहीन होवोत, आणि त्याची पत्नी विधवा होवो; 10 त्याची मुले भीक मागत भटकोत, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घरातून ते बाहेर हाकलण्यात येवो. 11 त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो; आणि त्याने कष्टाने मिळविलेले सर्वकाही परके लुटोत. 12 त्याच्यावर दया करणारा कोणीही नसो; त्याच्या पितृहीन मुलांची कीव करणारा कोणीही नसो, 13 त्याची सर्व पितृहीन मुले मरोत; एकाच पिढीमध्ये त्याच्या वंशाचे नाव पुसून टाकले जावो. 14 त्याच्या आईवडिलांच्या अपराधांबद्दल याहवेह त्याला शासन करो; त्याच्या मातेची पातके कधीही पुसली न जावो. 15 त्याने केलेल्या दुष्ट कृत्यांची याहवेह सतत आठवण ठेवो, व पृथ्वीवरून त्याचे नाव ते कायमचे पुसून टाकोत. 16 कारण त्याने इतरांना दया दाखविली नाही, उलट गरजवंतांचा त्याने छळ केला आणि दुःखीकष्टी लोकांचा त्यांना मृत्यू येईपर्यंत पाठलाग केला. 17 इतरांना शाप देणे त्याला आवडत असे— म्हणून त्याचे शाप त्याच्यावरच उलटू द्या. इतरांचे हितचिंतन करण्यात त्याला आनंद वाटत नसे— म्हणून त्याचेही हित न होवो. 18 त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली; ते त्याच्या शरीरात पाण्यासारखे, व त्याच्या हाडात तेलासारखे शिरले. 19 आता त्याचे ते शाप त्याला वस्‍त्रांप्रमाणे पांघरूण टाकोत, एखाद्या कटिबंधासमान ते त्याला जखडून टाकोत. 20 जे माझे शत्रू माझ्याविषयी खोट्या गोष्टी उठवितात, त्यांना माझे याहवेह परमेश्वर हाच मोबदला देवो. 21 तरी हे सार्वभौम याहवेह, तुमच्या नावासाठी माझ्यावर कृपा करा; आपल्या करुणामय प्रीती अनुरूप माझी सुटका करा. 22 कारण मी दीन आणि दरिद्री आहे, माझे अंतःकरण घायाळ झाले आहे. 23 संध्याछायेसारखा मी समाप्त होत आहे; टोळा सारखा मी झटकून टाकला जात आहे. 24 उपासाने माझे गुडघे शक्तिहीन झाले आहेत; मी कातडी आणि हाडे यांचा सापळा झालो आहे. 25 विरोधकांसाठी मी अपयशाचे प्रतीक झालो आहे; मला पाहून ते डोकी हलवितात. 26 हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुमच्या अक्षय प्रीतिनुरुप माझे तारण करा. 27 हे याहवेह, सर्वांना कळावे की जे काही होत आहे, ते सर्वकाही तुमच्याच हातांनी केले आहे. 28 त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा; जे माझ्यावर हल्ला करतात, ते लज्जित होवोत, पण मी, तुमचा सेवक मात्र हर्षभरित होवो. 29 माझे विरोधक एखाद्या वस्त्राप्रमाणे अनादर धारण करोत, आणि लज्जेने ते स्वतःस पांघरूण घेवोत. 30 परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन, उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन. 31 कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात, त्यांना मृत्युदंड देणार्‍यापासून ते त्यांना संरक्षण देतात.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate