Menu

अनुवाद 3

IRV

1 मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली. 2 परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा. 3 आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही. 4 मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच. 5 या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती. 6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही. 7 गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली. 8 “अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा. 9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.) 10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलेखा व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला." 11 रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे. 12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे. 13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात. 14 मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्यास हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.) 15 आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला. 16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली. 17 तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला. 18 त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे. 19 तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील. 20 आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हास दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या." 21 मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील. 22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे." 23 मग त्या वेळी मी परमेश्वरास विनंती करून म्हणालो, 24 “हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासास आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे? 25 तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे." 26 पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको. 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस. 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्यास उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांस पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल." 29 “आणि आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो."

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate