स्तोत्रसंहिता 92
CBI1 याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे. 2 प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा, 3 दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे. 4 हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे. 5 हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत! 6 मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की, 7 दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे. 8 परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात! 9 हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल. 10 परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे. 11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला; माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली. 12 नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील; 13 जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील. 14 वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील. 15 ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही."
