Menu

स्तोत्रसंहिता 37

CBI

1 दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस. 2 कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील, हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील. 3 याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील. 4 याहवेहमध्ये आनंद कर, म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील. 5 तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील: 6 तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल, तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल. 7 याहवेहसमोर निश्चिंत राहा व धीराने त्यांची वाट पाहा; जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते, त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस. 8 तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको; हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील. 9 दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. 10 थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांना शोधूनही ते तुला सापडणार नाहीत. 11 परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील. 12 दुष्ट लोक नीतिमानाविरुद्ध कट रचतात, त्यांना पाहून आपले दातओठ खातात; 13 प्रभू दुष्टांवर हसत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा दिवस येत आहे. 14 दीनदुबळ्यांस ठार करावे व सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करण्यास दुष्ट तलवार उपसतात आणि धनुष्य वाकवून सज्ज करतात. 15 परंतु त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदणार, आणि त्यांची धनुष्ये तोडून टाकली जाणार. 16 दुर्जनांनी दुष्टाईने मिळविलेल्या विपुल धनापेक्षा नीतिमानाचे सीमित धन बरे; 17 दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात. 18 निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते, आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते. 19 कठीण काळी ते लज्जित होणार नाही; दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल. 20 पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील: याहवेहचे शत्रू हे मैदानातील फुलांप्रमाणे वाळून जातील आणि धुराप्रमाणे दिसेनासे होतील. 21 दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत, परंतु नीतिमान उदारपणे देत असतो; 22 याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील, परंतु जे शापित आहेत, ते नष्ट होतील. 23 ज्याला याहवेह प्रिय वाटतात, त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात; 24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील. 25 मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे, तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही. 26 ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात; त्यांची संतती आशीर्वाद असते. 27 वाईटापासून दूर राहा आणि चांगले ते करा; म्हणजे तुम्ही या देशात कायमचे राहाल. 28 कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे; ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही. दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील, दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल. 29 नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल आणि आपल्या वतनात ते सर्वदा राहतील. 30 नीतिमान आपल्या मुखाने ज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याची जीभ जे न्याय्य आहे ते उच्चारते. 31 परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात; त्याची पावले घसरणार नाही. 32 दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात, त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात. 33 परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही, किंवा न्यायालयात त्यांना ते दोषीही ठरविले जाऊ देणार नाही. 34 याहवेहची प्रतीक्षा कर आणि त्यांच्या सन्मार्गाचे अवलंबन कर. तेच तुला उंच करून पृथ्वीचे अधिकारी करतील; दुष्ट लोक नष्ट झाल्याचे तू डोळ्यांनी पाहशील. 35 मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता. 36 परंतु तो लवकरच नाहीसा झाला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही. 37 सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे. 38 परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील; आणि त्याची संतती छाटली जाईल. 39 याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात. 40 याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate