स्तोत्रसंहिता 140
CBI1 याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा. 2 ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात व दररोज युद्ध भडकावित असतात. 3 त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला 4 दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत. 5 या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे, आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला 6 याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या. 7 सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा. 8 या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला 9 ज्यांनी मला वेढा घातला आहे, त्यांचे मस्तक गर्वाने उंचावलेले आहे; त्यांच्या मुखातून निघालेले कपट त्यांच्यावरच उलटो. 10 त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत; ते अग्नीत फेकले जावोत, जिथून सुटका होणार नाही, अशा खोल खाचात ते टाकले जावोत. 11 या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये; संकटे त्यांना शोधून त्यांचा नाश करोत. 12 मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात. 13 निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील.
