स्तोत्रसंहिता 103
CBI1 माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर. 2 हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको. 3 जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात, जे तुझे सर्व रोग बरे करतात. 4 जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात; आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात. 5 जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात; म्हणून गरुडासारखे तुझ्या तारुण्याचे नवीनीकरण होते. 6 ज्यांच्यावर जुलूम केला गेला, त्या सर्वांना याहवेह धार्मिकतेने व न्यायाने वागवितात. 7 त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले, आणि आपली अद्भुत कृत्ये इस्राएली लोकात केली: 8 याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत. 9 ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत. 10 ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत. 11 कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्यांवर विपुल आहे. 12 पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे, तेवढे त्यांनी आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत. 13 जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत. 14 कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे. 15 मर्त्यप्राण्याचे जीवन गवताप्रमाणे आहे, ते मैदानावर एखाद्या फुलासारखे फुलतात; 16 परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते, ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही. 17 परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते. 18 जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात. 19 याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे, आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे. 20 अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा. 21 अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो, त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. 22 त्यांच्या अधिपत्त्यातील अखिल रचनांनो, याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
