स्तोत्रसंहिता 101
CBI1 हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन. 2 सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्हेने करेन. 3 मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे नजर टाकणार नाही. मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे. त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन. 4 कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही. 5 आपल्या शेजार्यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्यास, मी नष्ट करेन; दुसर्यांकडे तुच्छतेने पाहणार्याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल. 6 देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील. 7 परंतु जे इतरांची फसवणूक करतात, अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही, आणि जे असत्य बोलतात, ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत. 8 दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.
