नीतिसूत्रे 15
CBI1 कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात. 2 सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते. 3 याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते. 4 सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते. 5 मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो. 6 नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते. 7 सुज्ञ व्यक्तीचे मुख ज्ञान पसरवितात, पण मूर्खांचे ह्रदय सरळ नसते. 8 याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते. 9 दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात. 10 जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील. 11 मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत— त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल! 12 उपहास करणार्यांना सुधारणेचा राग येतो, म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात. 13 आनंदी मन चेहरा उल्हासित करते, आणि शोकाकुल हृदयाने आत्मा खिन्न होतो. 14 सुज्ञ अंतःकरण ज्ञानाचा माग घेते, परंतु मूर्खाच्या मुखाचे मूर्खतेनेच पोषण होते. 15 पीडित मनुष्याचे सर्व दिवस क्लेशपूर्ण असतात, परंतु आनंदी अंतःकरणासाठी सर्व दिवस उत्सवाचे असतात. 16 अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे. 17 तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे. 18 तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो. 19 आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात, परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो. 20 समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो. 21 मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो. 22 उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात. 23 समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे! 24 सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो. 25 गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात. 26 दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात. 27 लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल. 28 नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो. 29 याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात. 30 निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते, आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते. 31 जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल. 32 जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो. 33 याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.
