Menu

यशायाह 15

CBI

1 मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! 2 दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे. 3 रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात. 4 हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत. 5 माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात. 6 निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही. 7 म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात. 8 त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो. 9 दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate