Menu

उत्पत्ती 15

CBI

1 या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे." 2 यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?" 3 अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल." 4 तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल." 5 मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल." 6 अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. 7 त्यांनी त्याला सांगितले, “मी याहवेह आहे. मी ही भूमी कायमची वतन करून देण्यासाठी तुला खास्द्यांच्या ऊर या शहरातून येथे आणले आहे." 8 पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?" 9 मग याहवेह त्याला म्हणाले, “तू तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, तसेच एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घेऊन ये." 10 अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही. 11 त्या प्राण्यांच्या मृतशरीरांवर गिधाडांनी झडप घातली, तेव्हा अब्रामाने गिधाडांना हुसकावून लावले. 12 सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला. 13 मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. 14 परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील. 15 पण तू चांगला म्हातारा होऊन मरण पावशील व शांतीने तुझ्या पूर्वजांबरोबर पुरला जाशील. 16 चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही ." 17 नंतर सूर्य मावळला आणि अंधार पडला तेव्हा अब्रामाने त्या प्राण्यांच्या मृतशरीराच्या दोन ढिगांमधून धुमसते अग्निपात्र आणि पेटलेली मशाल जाताना पाहिली. 18 त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश— 19 केनी, कनिज्जी, कदमोनी, 20 हिथी, परिज्जी, रेफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे."

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate